मुंबई : टॅक्सी परवान्यातील आॅनलाईन लॉटरीमधील यशस्वी अर्जदारांना मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून दिलासा देण्यात आला आहे. इरादापत्राची कमी असलेल्या मुदतीमुळे यशस्वी अर्जदारास वाहनांची नोंदणी करता बऱ्याच अडचींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे इरादापत्राची मुदत वाढवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. ही मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रात रद्द झालेल्या टॅक्सी परवान्यांच्या रिक्त संख्येच्या जागी आॅनलाईन टॅक्सी परवाना योजना ६ सप्टेंबर २0१४ ते २0 सप्टेंबर २0१४ काळात राबविण्यात आली. त्यासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी लॉटरी काढण्यात आली आणि त्यातील यशस्वी अर्जदारांकडून १५ जानेवारी २0१५ पर्यंत सर्व संबंधित कागदपत्रे कार्यालयात तपासणीसाठी सादर करुन घेण्यात आले होते. ज्यांची कागदपत्रे वैध आढळली त्यांना त्वरीत इरादापत्रे जारी करण्यात आली. इरादापत्र जारी करताना त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली. या मुदतीत आॅनलाईन लॉटरीत यशस्वी झालेल्या अर्जदाराने वाहन तपासणीसाठी सादर करुन परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे. परवानाधारकास इरादापत्र प्राप्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत वाहन खरेदी करुन सर्व कागदपत्रांसह वाहन सादर करणे अनिवार्य असल्याने अर्जदारास सहा महिन्याच्या मुदतीत बँकेचे लोन प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे इत्यादी कामे करावी लागतात. बऱ्याचवेळा कागदपत्रे जमा करुन ती सादर करताना इरादापत्राची दिलेली सहा महिन्यांची मुदत संपून जाते. अशा वेळी अर्जदारास वाहन परवान्यावर दाखल करता येत नाही. परिणामी अर्जदाराने खरेदी केलेल्या वाहनाची नोंदणी करणे अशक्य होते. त्यामुळे अर्जदारास आॅनलाईन लॉटरीत यशस्वी होऊनही परवाना जारी करता येत नाही. अशा अर्जदारांच्या इरादापत्रास मुदत वाढ देणे आवश्यक होते. त्यानुसार टॅक्सी परवान्यासाठीच्या आॅनलाईन लॉटरीमधील यशस्वी अर्जदारांना जारी करण्यात आलेल्या इरादापत्रास मुदत समाप्तीच्या दिनांकापासून सलग तीन महिन्यापर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
इरादापत्रास तीन महिन्यांची मुदतवाढ
By admin | Published: November 03, 2016 2:02 AM