मुंबई : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे फोटो काढण्यासाठी बॉम्बे हाउस येथे गेलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या तीन छायाचित्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एम. आर. ए. मार्ग पोलिसांनी सोमवारी आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. शंकर तारासिंग अय्यर (३५), अशोक तुकाराम बामणे (४१) आणि मनविर जगिंदरसिंग प्रजापती (२८) अशी आरोपींची नावे असून, आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे.बॉम्बे हाउसमध्ये असलेल्या टाटा उद्योग समूहाच्या मुख्यालयात शुक्रवारी दुपारी मिस्त्री येणार असल्याची माहिती मिळाल्याने वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे पत्रकार तसेच छायाचित्रकारही तेथे पोहोचले होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मिस्त्री तेथे पोहोचताच छायाचित्रकारांनी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकारांना फोटो काढण्यास मज्जाव करत त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी इंग्रजी वृत्तपत्राचे अतुल कांबळे, एच. एल. सांजकुमार आणि अर्जीन सेन हे सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाले. अन्य सहकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांच्या तावडीतून छायाचित्रकारांची सुटका करून त्यांना उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य छायाचित्रकारांनी काढलेले व्हिडीओ ताब्यात घेत त्याच रात्री या प्रकरणी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शनिवारी सकाळी मयूरेश गुरव आणि गणेश शिंदे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींना ११ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाने दोघांनीही केलेल्या जामीन अर्जानुसार त्यांना जामीन मंजूर केला. पोलिसांनी पुढील कारवाई करत अय्यर, बामणे आणि प्रजापती यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
आणखी तिघांना अटक
By admin | Published: November 08, 2016 5:08 AM