ठाणे : येथील वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील दरोड्याप्रकरणी आणखी तिघांना शनिवारी शहर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी ३५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या तिघांमुळे आरोपींची संख्या ९ झाली असून त्यांच्याकडून एकूण ६ कोटी ५१ लाख रुपये हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दरोड्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी ६ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४ कोटी २० लाखांची रोकड आणि गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने आणि शस्त्रेही हस्तगत केली होती. शनिवारी योगेश चव्हाण (२९), पांडुरंग चव्हाण (२९) आणि नवनाथ चव्हाण (२८) या तिघांना नाशिक, इगतपुरी येथून अटक केली. ते तिघे नाशिकच्या माणिकखांब या एकाच गावातील रहिवासी असून तिघे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर पुढील तपास करीत आहेत. ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या सहा जणांसह शनिवारी पकडलेल्या तिघांना ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोड्यातील पैसेवाटप करणाऱ्यासह आणखी तिघांची नावे पुढे आली आहेत. पैसेवाटप करून तो तिरुपती अथवा गोव्याला पळून गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी प्रत्येकी एकेक पथक रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.नाशकात या दरोड्याचे कनेक्शन समोर आल्यावर सात ते आठ पथके शहर पोलिसांनी तेथे तैनात केली. यापैकी तीन पथके अजूनही तेथेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी) आतापर्यंत ६ कोटी ५१ लाखांची रोकड हस्तगतचेकमेट कंपनीतील दरोड्यात दरोडेखोरांनी ९ कोटी १६ लाखांची रोकड लांबवली. त्यातील, आतापर्यंत ६ कोटी ५१ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. शुक्रवारी ४ कोटी २० लाख तर शनिवारी २ कोटी ३५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती.त्या शेतमालकाचा शोध सुरू दरोड्यानंतर ज्या शेतात तत्काळ पैसेवाटप झाले, ते शेत नक्की कोणाचे आहे, हे अद्यापही समोर आले नाही. त्यामुळे आता त्या शेतमालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.हे तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार दरोड्याप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या सहा जणांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, मात्र शनिवारी पकडलेले तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकमधून आणखी तिघांना अटक
By admin | Published: July 03, 2016 1:56 AM