मुंबई - प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. सुनेत्रा पवार यांचे नाव बुधवारी रात्री निश्चित करण्यात आले. मात्र, नावाची अधिकृत घोषणा न करताच गुरुवारी विधानभवनात त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित होते. मात्र, महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिंदेसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता.
विरोधकांकडून कुणीही अर्ज दाखल न केल्याने सुनेत्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता संसदेत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुनेत्रा पवार या बारातमीच्या तिसऱ्या खासदार असतील.
या जागेसाठी छगन भुजबळ, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी इच्छुक होते. भुजबळ यांच्यासह काही आमदारांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जाते, असा सवाल भुजबळांनी विचारला. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हेच निर्णय घेत असून, इतरांशी सल्लामसलत होत नसल्याने नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाच्या काही अडचणी असतात. त्यानुसार ही उमेदवारी दिली गेली. आपण इच्छुक होतो; पण नाराज नाही. पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला काम करावे लागते. मी नाराज दिसतो का? प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते असे नाही. - छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते