औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी दुपारी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर काँग्रेस-एमआयएमविरुद्ध शिवसेना-भाजपा असा ‘हाय-व्होल्टेज ड्रामा’ रंगला. ‘वंदे मातरम्’ गीत सुरू असताना काँग्रेसचे सोहेल शेख, एमआयएमचे सय्यद मतीन बसून राहिल्याने गोंधळाला सुरुवात झाली. सभागृहात जोरदार घोषणाबाजीबरोबरच धक्काबुक्की, माइकची मोडतोड करण्यात आली. या गोंधळानंतर महापौरांनी एमआयएमच्या तिघांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द केले.सभेला ठीक १२ वाजता वंदेमातरम् गीताने सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे सोहेल शेख, एमआयएमचे सय्यद मतीन बसून होते. सोहेल आणि मतीन यांनी वंदेमातरम् गीताचा अवमान केल्याचा मुद्दा युतीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आणि वादाला सुरूवात झाली. महापौर बापू घडमोडे यांच्या आसनासमोर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. या गोंधळातच शिवसेनेचे नगरसेवक मनोज बल्लाळ आणि नितीन साळवी तसेच मतीन यांनी माइकची मोडतोड केली. महापौरांनी काही काळासाठी कामकाज तहकूब केले. थोड्या वेळाने सभेला पुन्हा सुरुवात झाल्यावर वंदेमातरम्चा मुद्दा उपस्थित करीत, युतीच्या नगरसेवकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या गोंधळातच नगरसेवक जफर बिल्डर यांनी शिवीगाळ सुरू केली. तर, शिवसेनेच्या काही नगरसेविकांनी माइकची मोडतोड केली.पोलीस विनापरवानगी सभागृहातसर्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारी महापौर असतात. त्यांच्या परवानगीशिवाय पोलिसांना सभागृहात प्रवेश करता येत नाही. शनिवारी मात्र विनापरवानगी पोलीस सभेत घुसले. ते नगरसेवक जफर बिल्डर यांना धरून बाहेर नेऊ लागले. पोलीस सभागृहात येताच गोंधळात अधिकची भर पडली.गोंधळातच निलंबनमहापौरांनी गोंधळातच एमआयएमचे जफर बिल्डर, सय्यद मतीन आणि समिना शेख यांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाºया नगरसेवकांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी. गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाला पाठवावा, असे आदेश देत सभा तहकूब केली.काँग्रेस नगरसेवकाचे नाव वगळलेवंदेमातरम्च्या मुद्यावर महापौरांनी प्रथम काँग्रेसचे नगरसेवक शेख सोहेल यांना निलंबित केल्याचे जाहीर केले. नंतर हा निर्णय बदलून एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. सोहेल यांचे नाव अचानक का वगळण्यात आले, याचे उत्तर मिळाले नाही.नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीला दिलेल्या मंजुरीचे तीव्र पडसाद शनिवारी महासभेत उमटले. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.शिवसेना सदस्यांनी तर पीठासनावरच बैठक मारली आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. राजदंड खेचाखेचीत काही नगरसेवक पीठासनावरून खालीही पडले. अखेर प्रचंड गोंधळातच महापौरांनी महासभा संपल्याचे जाहीर करत विषयपत्रिकेवरील सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली. स्थायी समितीने घरपट्टीत १८, तर पाणीपट्टीत पाच वर्षांत १२० टक्के करवाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. सदस्य काळ्या टोप्या घालून आले होते.महापालिकांची सभागृहे झाली आखाडाशनिवारी राज्यातील तीन महापालिकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीत सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख, एमआयएमचे सय्यद मतीन हे बसून होते. त्यामुळे काँग्रेस-एमआयएम विरुद्ध भाजपा-शिवसेना नगरसेवकांमध्ये जुंपली़ अखेर महापौरांनी एमआयएमच्या नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले़ नाशिक पालिक करवाढीविरोधात विरोधकांनी गोंधळ घातला़ शिवसेना नगरसेवकांनी तर राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला़ अकोला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांच्या चर्चेत गदारोळ झाला़ विरोधी पक्षाच्या नगरसेविका उषा विरक यांनी चक्क बेशरमचे झाड सभागृहात आणले़
तीन महापालिकांमध्ये घमासान; ‘वंदे मातरम्’वरून हाणामारी, करवाढीला विरोध, सभागृहात बेशरमचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 2:42 AM