औरंगाबाद : ब्रेनडेड वकिलाच्या अवयवदानामुळे तीन जणांना नवजीवन मिळाले, तर नेत्रदानामुळे एका अंधाचे आयुष्य प्रकाशमान होत आहे. मंगळवारी झालेल्या बाराव्या अवयवदानाच्या शस्त्रक्रियांनी औरंगाबादच्या वैद्यकीय इतिहासात पुन्हा एक सुवर्ण अध्याय लिहिला. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर येथील अॅड. बाळासाहेब देशमुख - चौसडीकर (७५) ३० एप्रिल रोजी अचानक कोसळले. नातेवाइकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत माणिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना अॅड. देशमुख यांचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी निदान केले. मंगळवारी रात्री डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला त्यांच्या मुलांना दिला. मुलगा विक्रम याने आई मनीषा यांना ‘हृदय, यकृत, दोन्ही किडन्या, नेत्र आणि त्वचासुद्धा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील’, असे सांगितले. आईनेही मोठ्या धीराने होकार दिला. डॉक्टरांनी वेळ न दवडता विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला (झेडटीसीसी) माहिती कळविली. (प्रतिनिधी)
वकिलाच्या अवयवदानाने तिघांना जीवदान
By admin | Published: May 04, 2017 3:39 AM