राज्यात भाजपाने आपले २० उमेदवार जाहीर करून लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. अशातच अद्याप शिंदे-पवार गट आणि मविआच्या तीन पक्षांच्या यादीची प्रतिक्षा आहे. जागावाटपावरून या सर्व पक्षांची यादी रखडली आहे. त्यात मविआला प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जखडून ठेवले असल्याने या यादीलाही विलंब होत आहे. संजय राऊत यांनी या यादीवर वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी व इतर सर्व घटक पक्ष चांदवडच्या शेतकरी मेळाव्यात येणार आहेत. 17 तारखेला मुंबईत शिवाजी पार्कला उद्धव ठाकरे येतील. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची कालच चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंना खास मुंबईसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. ते भारत जोडो न्याय यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत, असे राऊत म्हणाले.
नाशिकमध्ये देखील शिवसेना राहुल यांचे उत्साहाने स्वागत करणार आहे. शिवसेनेला सावरकरांबाबत कायम आदर आहे. भाजपने फक्त प्रेमाचे ढोंग केले आहे. त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करतोय, का दिला जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
भाजपाच्या यादीत नितीन गडकरींचे नाव आल्याबाबत विचारले असता पहिल्या यादीत नाव आले असते तर आनंद झाला असता असे राऊत म्हणाले. याचबरोबर निलेश लंकेंसोबत माझीही चर्चा झाली होती. घरवापसी पेक्षा शरद पवार हेच सर्वांचं छत्र आहे. लंके लोकसभा पुन्हा लढणार असतील तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात दोन दिवसांपूर्वी खरे-खोटेवरून वाद झाला होता. यावर राऊतांनी आंबेडकरांनी मागितलेल्या जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगितले होते. आता मविआच्या यादीवर राऊतांनी 48 जणांची यादी एकत्र येईल. संभ्रम नाही, जागावाटप पूर्ण झाले आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन जाहीर करतील असे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी वंचितचा उल्लेख केलेला नाहीय.