अकोला : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असतानाच, अकोला शहरातही या भयंकर आजाराचे आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्यात आणखी तीन जणांची भर पडल्याने जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या पाच झाली असून, या सर्व रुग्णांवर शहरातील एका खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एच १-एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून, त्याचा प्रसार झपाट्याने होतो. सध्या कडक उन्ह तापत असले, तरी स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गत १३ व २१ मार्च रोजी येथील एका खासगी रुग्णालयात अनुक्रमे अमरावती व अकोल्यातील नानकनगर, निमवाडी परिसरातील दोघांना स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. नमुन्यांची तपासणी केली असता, दोघेही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हापासून दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, २७ मार्च रोजी याच इस्पितळात दोन पुरुष व एका बालकास स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर दाखल करण्यात आले. हे तिन्ही रुग्ण तापडियानगर, पोलिस वसाहत आणि दीपक चौक या भागातील रहिवासी आहेत. तिघांचेही नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालातून या तिघांनाही स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोल्यात स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले!
By admin | Published: April 04, 2017 12:15 AM