चिखली (जि. बुलडाणा) : भरधाव वेगातील काळी पिवळी टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. ही घटना चिखली-मेहकर मार्गावरील मुंगसरी फाट्यावर १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेहकर येथून चिखलीकडे निघालेल्या काळीपिवळी टॅक्सीने (एम.एच २८ एच २२0५) विरुद्ध दिशेने मेहकरकडे जाणार्या एम.एच. ४0 एन.९५८१ क्रमांकाच्या एसटी बसला बाजू देत असताना टॅक्सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात टॅक्सीतील प्रवासी शिवाजी उत्तमराव देशमुख ( ५५ रा.सवडत ता.सिंदखेडराजा) व फिरोजखान जब्बार खान (२८ रा. मेहकर) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर हिवरा आङ्म्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश माधव काकडे (२0) रा.कव्हळा ता.चिखली याला गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. टॅक्सीतील अन्य प्रवासी शिवाजी लिंबाजी पवार (३0) रा.लव्हाळा, सोहम रामेश्वर पाटील (२0) रा.आन्वी, विजय उत्तम राजगुरू (४७) रा.देऊळगावमाळी, रशीदाबी अब्दुल रहीम ( ४५) रा.मेहकर, सदामशहा दाऊतशहा (२५) रा.जानेफळवेस मेहकर, सगीराबी अब्दुल गफ्फार (५६ ) रा.मेहकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातातील किरकोळ जखमी विकास प्रभाकर पवार (२0)रा.लव्हाळा, सकिराबी शेख फारूख (२९) रा.मेहकर यांच्यावर प्राथमिक उपचाराअंती रूग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान याप्रकरणी बसचालक प्रदीप रामकृष्ण जाधव रा. बुलडाणा यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी काळी पिवळी टॅक्सी चालक अब्दुल हमीद अब्दुल कदीर रा.मेहकर याच्याविरूध्द भरधाव वेगात व निष्काळजीपणाने वाहन चालवून प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ (अ) भादविनुसार गुन्हा दाखल केला.
टॅक्सी झाडावर आदळून तीन ठार
By admin | Published: September 02, 2016 2:27 AM