गोंदिया : अपरहणाच्या प्रकरणातील आरोपीकडून पैसे घेऊन त्याला सोडून देणाऱ्या एका सहायक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी पोलीस अधीक्षकांनी केली. पोलीस शिपायांना निलंबित करण्याची महिनाभरातील ही दुसरी कारवाई आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत अल्पवयीन मुलीला गोंदियाच्या हिवरा येथील एका तरूणाने पळवून नेले होते. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलीस ठाण्यात त्या युवकाविरूद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे यांच्याकडे असल्याने ते आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी गेले. परंतु आरोपीने पोलिसांना पैसे दिल्यामुळे अटक न करता पोलीस परतले. यानंतर तपास सालेकसा ठाण्यातील दुसरे सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडे गेला. त्यांनी आरोपीला अटक केली. परंतु त्यांनीही त्याला पैशांची मागणी केली. आरोपीने यापूर्वी पोलिसांना पैसे दिले आहेत, असे सांगितल्यामुळे एकाच ठाण्यात नोकरी करणाऱ्या त्या सहायक पोलीस निरीक्षकांनी आपल्याला जास्त पैसे कसे कमविता येईल यासाठी देवीदास हांडोरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले ही बाब आमच्या वरिष्ठाकडे सांग, असे सांगून आरोपीला आमगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्याकडे आणले. त्यांनी त्याचा जबाब नोंदवून प्रकरण पोलीस अधीक्षकांकडे पाठविले. या प्रकरणावर निर्णय घेऊन पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी २१ मार्च रोजी सहायक पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे, हवालदार खेमराज खोब्रागडे व विवेक यादव यांना निलंबित केले. (प्रतिनिधी)
सहायक निरीक्षकासह तीन पोलीस निलंबित
By admin | Published: March 24, 2016 2:06 AM