मुंबई : मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलबाहेरून मॉडेल व तिच्या मित्राचे अपहरण करून पोलीस ठाण्यात आणून तिचा पोलीस ठाण्यात विनयभंग करून साडेचार लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. या आरोपात तीन पोलिसांसह सहा जणांना गुरुवारी गजाआड करण्यात आले. काल या मॉडेलने पोलीस आयुक्त राकेश मारिया व सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि घडला प्रकार सांगितला. तेव्हा मारिया यांनी तत्काळ गुन्हे शाखा, एमआयडीसी युनिटच्या वरिष्ठ निरीक्षक गोपिका जहागीरदार यांना बोलावून घेत या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवला.ही घटना ३ एप्रिलला साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉलिडे इन हॉटेलमध्ये घडली. या मॉडेलला तिच्या कॉआॅर्डीनेटर महिलेने हॉटेलमध्ये २ लाख रुपयांची रोकड आणण्यासाठी धाडले होते. ती तेथे गेली तेव्हा संबंधित व्यक्तीने (पैसे देणाऱ्या) तिला हॉटेलच्या खोलीत बोलावले. तिला संशय व भीती वाटल्याने तिने खोलीत जाण्यास नकार दिला. तसेच आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. त्याच्यासह बाहेर पडताना तेथे एक खासगी गाडी धडकली. त्यातून खाली उतरलेल्या तीन तरुणांनी या दोघांना ताब्यात घेतले, गाडीत कोंबले व साकिनाका पोलीस ठाण्यात आणले. या सहा जणांमध्ये एपीआय खटापे, एपीआय सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई कोदे यांचा सहभाग होता. उर्वरित तिघांमध्ये महिला व दोन तरुण होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मॉडेलवर वेश्या तर तिच्या मित्रावर दलाल असल्याचा आरोप केला. तिचे दागिने काढून घेतले. यादरम्यान तिचा विनयभंग केला. तसेच गुन्हा न नोंदविण्यासाठी व सुटकेसाठी मित्राकडून साडेचार लाख रुपये उकळले, असा आरोप आहे.
मॉडेलचे अपहरण करणाऱ्या तीन पोलिसांना अटक
By admin | Published: April 24, 2015 1:50 AM