लातूर : जमिनीच्या वादातून रेणापूर तालुक्यातील सेलू जवळगा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी दुपारी विषारी द्रव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या तिघांचीही प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलू जवळगा येथील शिवाजी गोपाळ वाघे (६५) यांचा भावकीत जमिनीवरून वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असताना सव्वा एकर जमिनीतही त्यांच्या भावजयीने पोेलिसांच्या मदतीने कब्जा केल्याचा दावा वाघे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात रेणापूर पोलीस तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वारंवार तक्रार दाखल केली. मात्र त्याची दखल न घेतल्याने वाघे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी केशरबाई (५५) आणि मुलगा हणमंत (२७) यांनीही विषप्राशन केले. या तिघांवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)भावजय कांताबाई वाघे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी वाघे यांच्याविरोधात रेणापूर पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. ही जमीन कांताबाई यांच्या नावावर असल्याने तंटामुक्त समिती व गावातील नागरिकांच्या मदतीने ती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी वाघे यांनी विषारी द्रव प्राशन केले असावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात तिघांनी केले विषप्राशन!
By admin | Published: January 29, 2016 2:01 AM