स्वाइन फ्ल्यूचा कहर : ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू
अकोला: एच १ एन १ या विषाणूंपासून प्रसार होणाऱ्या स्वाइन फ्लू या जीवघेण्या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. अकोल्यात या आजाराने एकाचा बळी घेतल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच, या आजाराची लक्षणे आढळून आलेल्या खामगाव तालुक्यातील तीन रुग्णांना मंगळवारी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.वराहांमध्ये आढळणाऱ्या एच १ एन १ विषाणूंमुळे स्वाइन फ्लू हा आजार संसर्गजन्य असून, हवेच्या माध्यमातून एकापासून दुसऱ्याला या आजाराची लागण होते. या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याची थुंकीमधून होतो. शहरात आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराचे नऊ पॉझिटिव्ह आढळले असून, यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात धुमाकूळ घातल्यानंतर स्वाइन फ्लूचा मोर्चा आता बुलडाणा जिल्ह्याकडेही वळला आहे. मंगळवारी खामगाव शहरातील दोन पुरुष व खामगाव तालुक्यातील कारेगाव-हिंगणा येथील एका महिलेस स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर येथील सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या रुग्णांचे स्वॅब घेतले असून, तपासणीसाठी ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांवर स्वाइन फ्लूचा उपचार सुरू करण्यात आला असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सर्वोपचारमध्ये पारस येथील एका संशयित महिला रुग्णावर उपचार सुरू आहे. आणखी तीन रुग्ण दाखल झाल्यामुळे संशयित रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.