पाटण : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी व त्यावरील शिवसागर जलाशयात साठविलेल्या १०४ टीएमसी पाण्यापैकी १ जूनपासून आत्तापर्यंत ६३.९१ टीएमसी पाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर झाला असून, त्याआधारे ३४७ दिवसांमध्ये तब्बल ३००६ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.कोयना धरणातील पाणीवापराचे तांत्रिक वर्ष सरण्यास आता केवळ १२ दिवस उरलेले असतानाही धरणात ४२.८८ टीएमसी इतका पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे आगामी जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल झाला नाही किंवा उशिरा झाला तरी वीजनिर्मिती किंवा सिंचनासाठीच्या पाणीवापराची चिंता उरलेली नाही. एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेचे कोयना धरण संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरले आहे. महाराष्ट्रातील एकूण ४६ धरणांपैकी कोयना धरण हे शासनाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य प्रतीक आहे. १ जून २०१४पासून कोयनेच्या पाण्यावर पायथा वीजगृहातून १२.८८ मेगावॅट, चौथ्या टप्प्यातून १२१३ मेगावॅट तर पोफळी येथील टप्पा क्रमांक १ व २मधून ११४०.७ मेगावॅट आणि अलोरे वीजगृहातून ५५९ मेगावॅट अशी एकूण ३००६ मेगावॅट वीजनिर्मिती ३४७ दिवसांमध्ये करण्यात आली.दुसरीकडे सांगलीकडील म्हणजेच पूर्वेकडे सिंचन व शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापर्यंत २९.५१ टीएमसी पाणी कोयना धरणातून सोडण्यात आले आहे. गतवर्षी याच दिवशी २२.९६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनचा पाऊस सुरू होईपर्यंत २२.९६ टीएमसी पाणीसाठा पुरणार का? अशी भीती निर्माण झाली होती. यंदा मात्र कोयना धरणात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. (वार्ताहर)
‘कोयना’तून तीन हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
By admin | Published: May 18, 2015 3:57 AM