गडकरी यांची घोषणा : मोटार वाहन कायद्यात बदल करणारनबिन सिन्हा : नवी दिल्लीएखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. त्यानंतरही वाहन चालकाने पुन्हा वाहतुकीचे नियम तोडले तर मात्र त्याचा परवाना कायमचा रद्द केला जाईल. यासाठी येत्या महिनाभरात मोटार वाहन विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ता परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले.केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात बदल करून वाहतूक नियम तोडणार्यांविरुद्ध कठोरपणे वागण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि भारतासाठी आदर्श असा कायदा तयार करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व सिंगापूरसह काही प्रमुख देशांमधील मोटार वाहन कायद्याचा अभ्यास करण्याची सूचना अधिकार्यांना दिली.यापुढे वाहतुकीचे नियम तोडणार्यांना केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही. तर तीनवेळा सिग्नल तोडणार्यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करू. त्यानंतरही त्याने सिग्नल तोडल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल, असे गडकरी म्हणाले.सध्याच्या रस्ता सुरक्षा नियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये बदल करण्याची आपली इच्छा आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व राज्ये व अन्य पक्षांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल. यासोबतच रस्ता सुरक्षेवरील राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम लागू केला जाईल. तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची पुनर्रचना केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक रोडमॅप तयार करण्याची सूचना गडकरी यांनी आपले उपमंत्री कृष्णा पाल यांना केली आहे.हा मुद्दा युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडले जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या विकसित देशांमधील वाहतूक नियम व कायद्यांचा अभ्यास करण्यात येईल. वाहतुकीचे नियम तोडणार्यांना सोडले जाणार नाही, असे गडकरी म्हणाले.भारतात दरवर्षी १.४ लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात आणि ५ लाखांवर लोक जखमी होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण विभागांची ओळख पटविण्याच्या दिशेने विस्तृत अभ्यास करण्याचे राष्ट्रीय माहमार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
तीनवेळा सिग्नल तोडल्यास लायसन्स रद्द
By admin | Published: June 05, 2014 10:09 PM