पुणे : एखाद्या रुग्णाचा झालेला मृत्यू हा नेमक्या कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी आणखी तीन रुग्णांचे अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीकडे पाठवण्यात आले आहेत. यांपैकी २ पुणे शहरातील असून, १ अहमदनगर जिल्ह्यातील आहे.काही महिन्यांपासून शहरासह संपूर्ण राज्यात डेंगी व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकीही साचल्याने डेंगीच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य आरोग्य विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले आहे. साथीच्या आजारांमुळे ३ रुग्णांचा आॅगस्ट महिन्यात मृत्यू झाला होता. यामध्ये एक ८० वर्षीय ज्येष्ठ महिला, ४४ वर्षीय पुरुष आणि १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या रुग्णांचा मृत्यू नेमका कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी संबंधित रुग्णांचे अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीकडे पाठविण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)>या अहवालाचा निकाल आल्यावर या व्यक्तींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. शहरातील एका रुग्णांचा मृत्यू डेंगीने झाला असल्याचा अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीने नुकताच दिला होता. या पार्श्वभूमीवर, या अहवालाचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. >अहवाल संशोधन विभागाकडेही राज्य स्तरावर काम करणारी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती आहे. कीटकजन्य आजारावर उपचार घेत असलेल्या एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास तो नेमक्या कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, हे निश्चित करण्याचा अधिकार ‘कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समिती’ला असतो. या समितीमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, सहायक संचालक आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक संचालक हिवताप व वैद्यकीय विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय विभाग अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे प्रतिनिधी अशा वेगवेगळ्या तज्ज्ञ व डॉक्टरांचा समावेश असतो. या समितीकडून संबंधित रुग्ण आजारी पडल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्यावर उपचार करणारे विविध डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञ या सर्वांकडून त्या रुग्णांची संपूर्ण सखोल माहिती मागवली जाते. ती कागदपत्रे स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी समितीकडे सादर केल्यानंतर संबंधित रुग्णाचे केलेले रोगनिदान, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणि त्यावरील उपचारांची सर्व कागदपत्रे या समितीतर्फे तपासली जातात. त्यातून मृत्यूचे निश्चित कारण दिले जाते. मृत्यूच्या कारणाची माहिती देण्याचा अधिकार केवळ समितीला असतो.
कीटकजन्य आजाराने घेतले तीन बळी?
By admin | Published: September 22, 2016 1:48 AM