बालाजी थेटे, औराद शहाजानी (जि. लातूर)सीमावर्ती भागातील लातूर-बीदर रोड ते तगरखेडा या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात तीन महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे़ गेल्या आठवड्यात तुगाव येथील तीन गरोदर महिला बाळंतपणासाठी औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे खासगी वाहनातून जात असताना वाटेतच त्या प्रसूत झाल्या़ सुदैवाने त्यांच्या जीवाला धोका पोहोचला नाही. नादुरुस्त रस्त्यामुळे वाहन सावकाश चालवले तरीही महिला बाळंत झाल्याचे वाहनचालक सतीश मिरकले यांनी सांगितले. मात्र संबंधित तीन महिलांचे घरी बाळंतपण झाल्याची नोंद त्यांच्या नातेवाइकांनी केल्याचे औराद आरोग्य केंद्राचे डॉ़ ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले़ तर सध्या तगरखेडा ते हालसी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे़, असे उपअभियंता डी़ के. पाटील यांनी सांगितले़ जागोजागी खड्डे पडल्याने काही ठिकाणी वाहतूकच बंद पडली आहे़ या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून लातूर-बीदर रोड ते तगरखेडा हा रस्ता वापरला जातो़ परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याचीही अवस्था वाईट झाली आहे़ रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत़ पावसाळ्यात तर खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात होतात.खराब रस्त्यांमुळे या मार्गावर कर्नाटक महामंडळाची एकच बस येथे धावत आहे, तर राज्य परिवहनची एकच फेरी होत आहे़
लातूरमध्ये खड्ड्यांमुळे तीन महिलांची रस्त्यातच प्रसूती
By admin | Published: May 18, 2015 3:41 AM