चिखलदरा (अमरावती), दि. 24 - शहरापासून काही अंतरावर असलेल्या कृषी विभागाच्या बंधा-यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तिघेही शनिवारपासून बेपत्ता होते. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेने नजीकच्या मोथा गावात शोककळा पसरली आहे.राजेश राजाराम दहीकर (१७), अशोक प्यारेलाल भास्कर (८), प्रेम प्यारेलाल भास्कर (११) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिघेही मोथा गावातील मखंजी रस्त्यावर कृषी विभागाने तयार केलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी गेले. यातील दोघांना पाण्यात बुडताना पाहून तिस-याने उडी घेतली व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवितानाच तोही बुडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशोक व प्रेम हे दोघे भाऊ मोथा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.रात्रभर गावक-यांची शोधमोहीमशनिवारी दुपारी खेळण्यासाठी गेलेले तिघेही घरी परतले नाहीत. संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू झाला. नजीकच्या जंगलातही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. रविवारी पहाटे ६ वाजता मखंजी रस्त्यावरील बंधा-याजवळ कपडे, चपला आढळून आल्या. सकाळी ९ वाजता तिघांचे मृतदेह बंधा-यातून बाहेर काढण्यात आले. प्यारेलाल भास्कर यांना दोन, तर राजाराम दहीकर यांना एकुलता एक मुलगा होता. तिघांच्या अपघाती निधनाने मोथा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.