सोलापूर : दुचाकी झाडाला धडकून खड्ड्यात पडल्याने ऐन विशीतले तीन तरुण जागीच ठार झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला .
एकाच दुचाकीवर तीन तरुण टाकळी चौकातून कुरघोटकडे जात होते. दुचाकी वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुचाकी झाडावर जोराने आदळून रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात पडली .यातील तिघेही गंभीर जखमी होऊन जागेवरच गतप्राण झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कुरघोटकडे जाणाºया प्रवाशांनी घटना पाहून तिघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघेही ठार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
महेश गंगाराम नरुटे (वय २०, रा़ कुरघोट, ता़ दक्षिण सोलापूर), अंबादास मुत्यापा होनमाने (वय १९, रा. कुरघोट) आणि राजकुमार पारप्पा पुजारी (वय १९, रा. लोणी, ता. चडचण) अशी त्यांची नावे आहेत . हे तिघेही परस्परांचे मित्र असून, ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. रविवारी सुट्टी घेऊन सकाळी तिघेही एकत्र बाहेर पडले. दुचाकीवरून रात्री उशिराने कुरघोटकडे जाताना हा प्रकार घडला. यातील राजकुमार पुजारी हा कर्नाटकातील लोणी गावचा आहे. अंबादास व्हनमाने याचा तो आतेभाऊ आहे. तो दोन दिवसांपासून कुरघोट येथे अंबादास याच्यासोबत होता.
रात्री टाकळी कुरघोट परिसरात हलकासा पाऊस येत होता, त्यामुळे चिखल, पाणी यामुळे रस्ता निसरडा झाला असावा. त्यातून दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. या घटनेची माहिती मंद्रुप पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा सुरू होता. उशिराने घटनेची नोंद करण्यात आली आहे.
तिघेही अविवाहितअंबादास व्हनमाने हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा तर ३ बहिणी आहेत. महेश नरुटे याला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. राजकुमार पुजारी कर्नाटकातील असल्याने त्याची अधिक माहिती मिळू शकली नाही. तीनही तरुण अविवाहित असून कुटुंबातील कमावते होते. या घटनेने तिन्ही कुटुंबांवर काळाने घाला घातला.