रविंद्र साळवे,
मोखाडा- मुंबईपासून काही मैलाच्या अंतरावर व खोडाळा-मोखाडा मुख्य रस्त्याच्या वरून ५ ते ६ किमीवर असलेल्या पेंडक्याचीवाडी परिसर विविधतेने नटलेला असून निसर्गाच्या सौंदर्यात भुरळ घालणार आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष राहिले असल्याने स्थानिक आदिवसी नाराज आहेत. पेंडक्याचीवाडी या पाड्यापासून २ किमी अंतरावर पेंडक्याची नदीवर हा निसर्ग सौंदर्यचा खजिना पहावयास मिळतो.३०० ते ४०० फूट उंचीचा बारमाही वाहणारा धबधबा प्राचीन काळातील गुहा व पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे हे सगळी दृष्य बघून मन भारावून जाते. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहेचा वापर त्याकाळी रहदारीसाठी केला जात असावा कारण या गुहेचा मार्ग ८ ते ९ किमी अंतरावरील वाशाळा या गावपाड्याशी जोडला गेला आहे. व येथील असलेला उंच धबधबा हा हजारो फूट खोल असून खोलीचा अंदाज अजून पर्यंत आलेला नाही. या नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले असावेत हे अर्धवट स्थितीत बांधण्यात आले असलेल्या बंधाऱ्यावरून लक्षात येते. तसेच या बांधाचा अजूनपर्यंत दगड सुद्धा हाललेला नाही यामुळे या बांधकामाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या बाबत अधिक माहितीसाठी येथील जुन्या जाणत्यांशी संपर्क साधला असता पांडवांच्या काळात येथील बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. या बाबतच्या अनेक सुरस कथाही त्यांनी ऐकवल्या. >काय करायला हवेशासनाने सर्व प्रथम या नदीवरील पूल व रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या धबधब्याचा परिसर सुशोभीत करायला हवा. या ठिकाणी बारमाही पाणी असल्याने वर्षभर पर्यटकांची रेलचेल असेल. तसेच यातून रोजगार उभा राहिल.