अनिरुद्ध पाटील बोर्डी : झाई समुद्रकिना-यापासून सुमारे दोन नॉटिकल परिसरात दोन स्पीडबोटी संशयास्पदरीत्या फिरत होत्या. त्यांनी मासेमारी बोटींकडे मोर्चा वळविल्यानंतर मच्छीमारांनी किनारा गाठून तटरक्षक दल आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर तत्काळ शोधमोहीम राबवून त्यांचा पाठलाग केला असता, त्या नौदलाच्या ‘स्वरा’ आणि ‘सुरभी’ या स्पीडबोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्याकडे ओळखपत्र तसेच कागदपत्र नसल्याचे तपासयंत्रणांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी केंद्रावरून मांगेला समाज मच्छीमार सोसायटीची गीताप्रसाद ही बोट बुधवारच्या पहाटे मासेमारीला गेली होती. बोटीत जयवंत दवणे, रीतेश दवणे, दीपक दवणे, गोविंद दवणे हे होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास किना-यापासून दोन नॉटिकल अंतर परिसरात पांढ-या-राखाडी रंगाच्या दोन स्पीडबोटी त्यांच्या जवळ येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर कोणताही ध्वज नव्हता, त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी तत्काळ किनारा गाठून तटरक्षक दल आणि घोलवड पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांना घेऊन ८.३०च्या सुमारास ‘त्या’ बोटींचा शोध सुरू केला. डहाणू तटरक्षक दलाने दमण तळावरील हेलिकॉप्टरला पाचारण करून शोध घेण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही बोटींवरील व्यक्तींना शरण येण्यास सांगितले. त्या वेळी आपण नेव्हीच्या सर्व्हे विभागातील असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बोटींवरील सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या १२ व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र आणि कागदपत्र नव्हते. आयएनएस जमुना या मुख्य बोटीच्या स्वरा बोटीचे लेफ्टनंट यश भारद्वाज आणि सुरभीचे लेफ्टनंट दीपक भाटी होते. त्यांच्यावर गुजरात राज्यातील खंबायत (हाजीरा) ते उंबरगाव या परिसराच्या हायड्रोग्राफिक सर्व्हेची जबाबदारी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे स. पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. ११.३०च्या सुमारास कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी तटरक्षकच्या टीमसह झाई बंदर गाठले.
महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत झाई समुद्रात रंगले पाठलागाचे थरारनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:29 AM