मुंबई : नागपूरचे डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आ. महादेव जानकर यांना भाजपाने शह दिल्याचे मानले जात आहे. डॉ. महात्मे हे नागपुरातील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ असून, ते धनगर समाजाचे आहेत. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीच्या आडून स्वत:च्या मंत्रिपदासाठी जानकर यांनी सरकारला सध्या वेठीस धरले आहे. ऊठसूट ते सरकारला इशारा देत आहेत. शिवाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम चौंढी या जन्मगावी ३१ मे रोजी होत असताना या कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका जानकर यांनी घेतली असून, ते मुंबईच्या आझाद मैदानावर वेगळा कार्यक्रम घेणार आहेत. जानकर यांनी मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रशंसा केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर, जानकर यांच्याबाबत सावध भूमिका घेत डॉ. महात्मे यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे आणल्याचे म्हटले जाते. मुंबई पालिकेची निवडणूक लक्षात घेत माजी आ. प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय झाला. मुंबईत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे दोन मराठा नेते असताना दरेकर यांचे महत्त्व वाढवून पक्षाने वेगळा संदेशही दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांना आमदारकी देऊन भाजपाने मित्रपक्षांना सोबत ठेवले आहे. भाजपाने राज्यसभेची उमेदवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशातून दिली आहे. भाजपाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. विकास महात्मे हे पक्षाचे राज्यसभेसाठीचे महाराष्ट्रातील उमेदवार आहेत.
महात्मेंच्या माध्यमातून जानकरांना शह
By admin | Published: May 31, 2016 6:43 AM