मुंबई : पवई आयआयटीमध्ये बुधवारी सकाळी बिबटय़ा शिरल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. एरवी एकटा मनुष्यवस्तीमध्ये शिरणारा हा बिबटया बछडयांसह शिरल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने स्थानिकांना घाम फुटला होता.
आयआयटीमधील धातू विज्ञान कार्यशाळेतील साहित्य ठेवण्याच्या खोलीत बिबटय़ा शिरत असल्याचे येथील एका कर्मचा:याच्या सकाळी निदर्शनास आले आणि काही वेळातच या बातमीने उपस्थितांना घाम फुटला. सकाळी अकरा वाजता याची माहिती स्थानिकांना समजताच त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनविभाग आणि ठाणो जिल्हयातील वनविभागाच्या अधिका:यांना माहिती दिली. यावर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले; आणि बिबटय़ाचा शोध सुरु केला.
वनविभागाच्या अधिका:यांना घटनास्थळी दोन वेगवेगळ्या पद्धतीचे ठसे आढळून आले आहेत आणि हे ठसे मादीमागोमाग आलेल्या बछडय़ांचे असावेत; अशी शक्यता प्राणीमित्र पवन शर्मा यांनी वर्तवली आहे. मात्र याबाबत ठोस माहिती वनविभागाने दिलेली नाही. रात्री उशिरार्पयत या परिसरात बिबटय़ाचा शोध सुरू होता. मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
दरम्यान, आयआयटीला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबटय़ाने आयआयटी संकुलात प्रवेश केला होता. त्यामुळे तो पुन्हा उद्यानात परतला असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात दोन पिंजरे बसविण्यात आले असून, वनविभागाचे एक पथक बिबटय़ाच्या मागावर आहे. (प्रतिनिधी)
आयआयटीत शिरलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी पिंजराही सज्ज ठेवला होता.