ठाणे : शिरो, रिंकू, ब्रुनो, मॅगी, आॅस्कर, एमिली, सिम्मा, फ्लफली, निमो, पंच, नियो, क्लाईव्ह, जिंजर, लोव्ही... असे तब्बल ५० पाळीव प्राणी रविवारच्या संध्याकाळी एकत्र जमले होते. निमित्त होते, त्यांच्या डॉगी टी पार्टीचे. ठाण्यात प्रथमच अशा प्रकारचा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला. पेट ओनर्स अॅण्ड अॅनिमल लव्हर्स अर्थात पॅल या संस्थेने ‘हर्बल ०४’ येथे ही पार्टी केली. ठाणे आणि मुलुंड परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पार्टीसाठी आणले होते. काही पाळीव कुत्रे नवीन ठिकाणी आल्याने घाबरलेले होते, तर काही मस्त एन्जॉय करीत होते. काही जण इकडे तिकडे धावत होते. या पाळीव कुत्र्यांबरोबर दोन पाळीव मांजरीही पार्टीचा आनंद लुटत होत्या. त्यातील एक होती माऊ आणि दुसरी रोमिओ. त्या मात्र फार कोणात मिसळत नव्हत्या. कारा नावाची काळ््या रंगाची डॉगी सर्वांचे आकर्षण होती. ती खास हेअर स्टाईल करुन आली होती. काही पाळीव कुत्र्यांनी तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगलदेखील घातला होता. या पार्टीसाठी हॉटेल मालकाने कुत्र्यांसाठी मांसाहार आणि आईस्क्रीम होते. स्नॅक्सनंतर त्यांच्यासाठी रिले, म्युझिकल चेअर आणि चमचा लिंबू यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नंतर प्राणीप्रेमींनी पाळीव प्राण्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. ठाण्यातील अनेक हॉटेलमध्ये कुत्र्यांना आणण्याची परवानगी दिली जात नाही मग त्यांना गाडीत ठेवाले लागते. कुत्र्यांच्या पार्टीसाठीही हॉटेल असले पाहिजे. जिथे त्यांना परवानगी मिळेल. त्यातून पाळीव प्राणी एकत्र येतील आणि त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर वेळ घालविता येईल या उद्देशाने ठाण्यात प्रथमच अशा पार्टीचे आयोजन केले असल्याचे पॅलचे मीडिया समन्वयक स्वाती बदादा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>प्राणिमित्रांच्या भावनाशारदा घारे, ठाणे : पाळीव प्राण्यांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सतत होण्याची गरज आहे. यामुळे त्यांना सोशलाईज होण्याची संधी मिळते. शिल्पा गिडतकर, ठाणे : ‘क्लाईव्ह’ला येथे आणण्याआधी माझ्या मनात खूप शंका होत्या. तो कोणावर भुंकेल का? मारामारी करेल का? पण इथे आल्यावर त्याचे इतर मित्र पाहून तो खूप खूष झाला. त्याच्या इतर मित्रांबरोबर त्याचा परिचयही झाला. क्लाईव्ह खूप उत्साही आहे. त्यामुळे त्याला आणि मलाही इथे येऊन खूप आनंद झाला.
भू भू आणि माऊची हॉटेलात रंगली टी पार्टी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 4:10 AM