नागपूर : राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी पद्मनाभन समितीच्या दरवाढीला ठाम विरोध दर्शविला असून आपल्या स्वतंत्र अहवालात मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकिटांचे दर १८, २२ आणि २६ रुपये असे सुचविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. बसवराज पाटील आणि वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्राने नेमलेल्या ई. पद्मनाभन समितीने मेट्रो तिकिटांचे दर ११० रुपये आकारण्याची शिफारस केली होती. त्यानुसार राज्याने माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांना सादर केलेल्या सुधारित अहवालात त्यांनी शिफारस केली आहे.मुंबईतील नालेसफाईच्या कामामध्ये कंत्राटदारांनी गैरव्यवहार उघडकीस आल्याने कंत्राट कामाचे अधिदान (अॅडव्हॉन्स पेमेंट) रोखण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली. महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने मोठ्या नाल्यांच्या ३२ कंत्राटदारांपैकी ९ कंत्राटदारांची प्राथमिक चौकशी केली आणि अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालानुसार अतिरिक्त आयुक्तांनी पुढील चौकशी केली. यात दोषी १३ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित कंत्राटदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून एका महिन्यात ती पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदस्य गोपालदास अग्रवाल, कालिदास कोळंबकर, नसीम खान, अमिन पटेल, अॅड. यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश फातर्पेकर, अॅड. के.सी. पाडवी, अॅड. वारिस पठाण, राधाकृष्ण विखे पाटील, किसन कथोरे, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, असलम शेख, अमित साटम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
मेट्रोचे तिकीट १८,२२ व २६ रुपये असावे
By admin | Published: December 09, 2015 1:21 AM