मुंबई : रेल्वे स्थानकात असलेले अनधिकृत प्रवेशव्दार, विना तिकीट प्रवाशांमुळे रेल्वेला होणारे आर्थिक नुकसान पाहता मेट्रोसारखीच तिकीट व्यवस्था (एक्सेस कंट्रोल) मुंबईच्या उपनगरीय मार्गावर आणण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीतील एका स्थानकात या यंत्रणेचा पहिला प्रयोगही लवकरच केला जाईल. रेल्वेच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) संस्थेकडून यावर काम सुरू आहे. मुंबई मेट्रो स्थानकात एक्सेस कंट्रोल यंत्रणा कार्यरत आहे. प्रवाशांनी तिकीट काढल्यावर त्यांना टोकन मिळते. प्रत्यक्षात मेट्रो स्थानकात जाण्यासाठी हे टोकन एका मशिनवर ठेवल्यावरच प्रवेश मिळतो. यामुळे विना तिकीट प्रवासी आढळून येत नाही. तसेच सुरक्षेवरही ताण पडत नाही. देशभरातील मेट्रोत अशाचप्रकारची यंत्रणा असल्याने रेल्वे स्थानकांवरही हीच यंत्रणा कार्यरत करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी रेल्वेच्या क्रिसकडून प्रयोग केला जाणार असून दिल्लीतील एका स्थानकात प्रयोग पार पडला जाईल. सध्या एक्सेस कंट्रोल यंत्रणेवर काम केले जात असल्याची माहिती क्रिसचे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. ही यंत्रणा मुंबई उपनगरीय स्थानकांवर आणली जाऊ शकते. मात्र स्थानकांत मोठ्या प्रमाणात असलेले अधिकृत आणि अनधिकृत प्रवेशव्दार आणि प्रवासी संख्या पाहता ही यंत्रणा राबविण्यासाठी बराच कालावधी लागेल. (प्रतिनिधी)सध्या दिल्लीतील एका स्थानकात त्याचा पहिला प्रयोग करण्याचा विचार आहे. त्यात यशस्वी झाल्यावर मुंबई उपनगरीय स्थानकाचा विचार होऊ शकतो, असेही ते म्हणाले. एक्सेस यंत्रणा आल्यास विना तिकीट प्रवासाला लगाम बसेल.
उपनगरीय स्थानकांवर मेट्रोसारखी तिकीट व्यवस्था?
By admin | Published: October 23, 2016 12:16 AM