ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येत असून टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रीसर्च या संस्थेतर्फे नेव्हीनगर, कुलाबा येथे सगळ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोफत आहे.
सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये गुरुत्वलहरींपासून ते प्रचंड मोठे फुगे कसे फुगवतात इथपर्यंतच्या गोष्टींमागलं विज्ञान विद्यार्थ्यांना समजावण्यात येणार आहे.
मुलांसाठी हा दिवस अत्यंत मनोरंजनाचा असेल असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. ब्लॅक होल्स, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज, ग्लास बबल्स अशा विविध विषयांवर मनोरंजक प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत, तसेच प्रयोगशाळांचीही सैर घडवणार आहेत.
रविवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सीएसटी जवळून 3, 11 व 125 क्रमांकाच्या तर चर्चगेटजवळून 137 क्रमांकाची बस नेव्हीनगरला जाते. तिथून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर टीआयएफआर आहे.