ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - वाघ आणि सिंह संख्या बळावर ठरतात. जंगलात राज्य कोणाच येईल हे कोणीही सांगू शकत नाही. वाघ की, सिंहाला निवडायचे हे जनताचं ठरवेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना म्हणाले. मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल असे विधान भाजपचे राज्यातील मंत्री प्रकाश मेहता यांनी केले. त्यावर शिवसेनेने वाघाचे पोस्टर लावून उत्तर दिले. त्यावर दानवे यांनी वाघ किंवा सिंह जनताच ठरवेल असे सांगितले.
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकाराला आज दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या कामाकाजावर बोलण्यासाठी ते मुंबई लोकमतच्या कार्यालयात आले होते. लोकसभा निवडणुका आम्ही तळगाळापर्यंत विकास, भ्रष्टाचार मुक्त शासन व्यवस्था आणि पारदर्शकता या मुद्यांवर लढवल्या. आज आमचं सरकार तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. खेडयातील शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोहोचलं आहे असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.
काँग्रेसने गरीबी हटवण्याच्या मुद्यावर निवडणूका लढवल्या पण गरीबी हटली का ? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांचा जनतेला कसा फायदा होत आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारने मुद्रा सारख्या योजनेतून व्यवसायासाठी कर्जाची चांगली सुविधा उपबद्ध करुन दिली आहे.
मुद्रा योजनेतंर्गत मोदी सरकारकडून व्यवसायासाठी ५० हजार रुपयांपासून पाच लाखापर्यंत कर्ज दिले जात आहे असे त्यांनी सांगितले. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी गॅसवरील सबसिडी सोडली. त्याचा फायदा आज अनेक गरीब कुटुंबांना मिळत आहे असे त्यांनी सांगितले.
पायाभूत सोयी-सुविधांना (इन्फ्रास्ट्रक्चर) आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यावर आमचे सरकार आज काम करत आहे. दिवसाला १८ कि.मी. चा रस्ता बांधला जात आहे. पाचवर्षानंतर आम्ही काय केले ते दिसेल असे दानवे यांनी सांगितले. केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोएल यांनी महाराष्ट्राची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक चांगली पावले उचलली आहेत. पूर्णवेळ २४ तास वीज मिळेल अशी स्थिती निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत असे दानवे यांनी सांगतिले.
यापूर्वीच्या सरकारमध्ये रेल्वे प्रकल्प मार्गी लागत नव्हते. आज रेल्वेचा विस्तार होत असून, त्यामध्ये राज्यांच्या गरजेला प्राधान्य दिले जात आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने दुष्काळावर चांगले काम केले आहे असा त्यांनी दावा केला. दुष्काळा संदर्भातील आकडे बदलल्यामुळे रिपोर्ट बदलले आणि त्यामुळे घोळ झाला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हे, तालुक्यांमध्ये लक्ष घातले असून ते माहिती घेत आहेत असे त्यांनी सांगितले.
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल बोलताना ते म्हणाले की, एकनाथ खडसे निर्दोष असून, संपूर्ण पक्ष खडसेंच्या मागे उभा आहे. पुन्हा मंत्रिपदाची इच्छा आहे ? या प्रश्नावर त्यांनी राजकारणात मिळालेला रोल उत्तमपणे रंगवणे ही माझी भूमिका आहे.
पक्षात मिळालेल्या पदावर मी समाधानी आहे. मला मंत्रिपदाचा मोह नाही असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस पदाला योग्य न्याय देत असून हे जनतेचे सरकार आहे असे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये भाजपच्या मंत्र्यांवर वारंवार आरोप होतात या प्रश्नावर त्यांनी आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात असे उत्तर दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी निवडणूका शिवसेनेसोबत एकत्र लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.