गणेश वासनिक,
अमरावती- गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीचे सीबीआय चौकशी आणि वनविभागाचे अहवाल पुन्हा तपासण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.वाघांच्या वाढत्या मृत्यूंबाबत केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: विदर्भात गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते १८ वाघांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये काही वाघांचा मृत्यू नैसर्गिक तर काहींच्या शिकारी झाल्याच्या नोंदी आहेत. या मृत्यूंबाबत सीबीआय आणि वनविभागाच्या अहवालात बरीच तफावत आढळल्यामुळे केंद्र सरकारने ‘क्रॉस चेकिंग’ आरंभले आहे. त्यात या वाघांचा खरोखर नैसर्गिक मृत्यूच झाला का, याचा शोध घेतला जाणार आहे. मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने विदर्भातील ताडोबा, मेळघाट व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांना लक्ष्य करून शिकारी केल्याचे सीबीआय चौकशीत स्पष्ट झाले होते. परंतु बहेलिया टोळीचा मुख्य सूत्रधार कट्टू याच्यापर्यंत वनविभागाला का पोहोचता आले नाही, याची कारणमीमांसा केंद्र सरकार करणार आहे. तसेच मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यात राहून वाघांची शिकार करणाऱ्या कमला पारधन या महिलेचाही विषय हाताळला जाणार आहे. (प्रतिनिधी)>केंद्र सरकारने आढावा घेतलावाघांच्या मृत्यूंसंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे, असे नागपूर येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) गिरीश वशिष्ठ यांनी सांगितले.>विजेच्या धक्क्याने मेलेल्या वाघाला शेतात पुरलेगोंडपिंपरी (चंद्रपूर) : रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी धानापूर शेतशिवारात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मंगळवारी रात्री पट्टेदार वाघाचा जागीच मृत्यू झाला. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच शेतात खड्डा खोदून मृत वाघाला पुरले. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर वन विभागाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. तसेच वाघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.