गेवरा (चंद्रपूर) : जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढली आहे. याची झळ वन्यजीवांनाही सोसावी लागत आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत डोंगरगाव बिट क्र. २५८ मध्ये एका १२-१३ वर्षे वयोगटातील वाघ मृतावस्थेत आढळून आला. दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्याविना या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.विशेष म्हणजे, मृतावस्थेतील वाघाचे सर्व अवयव सुरक्षित असून शरीरावर जखमाही आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याची तस्करीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याची शक्यता पूर्ण फेटाळण्यात आली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी व वन्यप्राणी मानवी वस्त्याकडे धाव घेऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वन्यप्राण्यांना जीवास मुकावे लागत आहे. जंगलात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असती, तर या वाघाचा जीव वाचविता आला असता. (वार्ताहर)
चंद्रपुरात वाघ मृतावस्थेत आढळला
By admin | Published: April 26, 2016 9:44 PM