नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघाची शिकार केल्याच्या प्रकरणातून अजितसह आणि त्याच्या चार साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.अजितला तीन वर्षापूर्वी आंध्र प्रदेशच्या तिरुपती येथून अटक करण्यात आली होती. त्याला गुरुवारी १० नोव्हेंबरला उमरेड प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्ती बी. आर. जांभुळे यांनी ठोस पुराव्यांच्या अभावी अजितसह त्याचे साथीदार सरजु, सारंगी, रौना यांची निर्दोष मुक्तता केली. आंध्र प्रदेश पोलीस आणि मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अजितला २६ सप्टेंबर २०१६ रोजी अटक केली होती. ३० सप्टेंबरला त्याला ट्रांझिट रिमांडवर नागपुरात आणले. न्यायालयात हजर करण्यासाठी नागपूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस लावले. चौकशीत अजितने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तारणा तलावाजवळ वाघ मारल्याची कबुली दिली होती. ९ ते १४ मे २०१३ दरम्यान वाघाची शिकार केल्याची माहिती दिली. वाघ मारण्यासाठी वापरण्यात आलेला मेटल ट्रॅपही तारणा तलावाजवळून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळावर खोदलेले खड्डे दाखवून मांस कापल्याच्या जागेची ओळख पटविली. त्यानंतर १६ मे रोजी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटनासाठी प्रवेश सुरू झाला. या दरम्यानही आरोपी अजितला उमरेड-कऱ्हांडला प्रवेशद्वाराजवळ पाहण्यात आले होते. परंतु तरीही त्याच्या सक्रिय होण्याची बातमी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही. विशेष म्हणजे, चौकशीत घोडाझरीजवळ वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी अजितचा साथीदार सारंगीला अटक केली होती. त्याने पवनीजवळ वाघ मारल्याची कबुली दिली. वन विभागाजवळ आरोपीच्या कबुलीचा रेकॉर्ड असूनही न्यायालयात पुरावे सादर करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले नाही. (प्रतिनिधी)
वाघाच्या शिकारीतील ‘तो’ निर्दोष
By admin | Published: November 13, 2016 2:38 AM