ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 24 : जिन्सी परिसरातील शाळेत शिकत असलेल्या त्या आठवर्षीय बालिकेवर आणखी तिघांनी अत्याचार केल्याची तक्रार कुटुंबियांनी जिन्सी ठाण्यात केली आहे. पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी जिन्सी ठाण्यात मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बालिकेवरील अत्याचार प्रकरणी अहमद खान अमीन खान (३७, रा. मंजूरपुरा) या नराधम शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर आजारी पडलेल्या बालिकेने आणखी तीन जणांनी आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती कुटुंबियांना दिली. अत्याचार करणाऱ्यांमध्ये शाळेतील आणखी एक कर्मचारी तसेच दोन रिक्षाचालक असल्याची माहिती बालिकेने दिली.
या व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार करीत होत्या. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांनी सरळ जिन्सी ठाणे गाठले. पीडित बालिकेचे नातेवाईक तसेच नागरिकांची ठाण्यात गर्दी झाली होती. त्यामुळे ठाण्याभोवती बंदोबस्त वाढविण्यात आला. सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती, ज्ञानोबा मुंडे, चार्ली पोलिसांचे पथक तसेचमहिला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करुन समजूत काढली. पोलिसांनी बालिकेच्या नातेवाईकांची तक्रार दाखल करुन घेतली.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. याबाबत जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, बालिकेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. तक्रारीची शहानिशा करुन आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.