मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून आहे. दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साह भरण्यासाठी खुद्द पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवारांच्या या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील सामील झाले आहेत.
जालना येथील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपकडून राज्यात करण्यात आलेल्या विकासकामांची पोलखोल केली. तर शिवसेनेचे नाव न घेता वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झाल्याचे म्हटले. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, आमदार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांनी भाषणात वाघ आणि एका मुलीची गोष्ट सांगितली. त्यात त्यांचा रोख हा शिवसेना आणि भाजपवर होता. ते म्हणाले की, शिवसेनेची अवस्था विचारूच नका. जंगलात एक वाघ होता. त्या वाघाला एका सुंदर मुलीवर प्रेम झालं. त्या मुलीच नाव आपल्याला ठावूक नाही. एके दिवशी मुलीची आणि वाघाची पहिली भेट होते. त्यावेळी मुलगी म्हणते, अरे तुझे दात मला लागतील की, त्यावर वाघ जातो आणि दात पाडून येतो. त्यानंतर पुन्हा दोघांची भेट होती. त्यावेळी मुलगी म्हणते अरे हे नख टोचतील की मला. त्यावर वाघ पुन्हा जातो आणि नखं काढून येतो. हे सगळ झाल्यानंतर वाघाला लक्षात येतं की आपण तर जंगलाचे राजे पण आता शिकार करायची कशी, खायच कसं. त्यानंतर या वाघाची अवस्था रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी होते.
काही दिवसांनी कुत्र्यासारखी अवस्था झालेल्या वाघाला तीच मुलगी भेटते. त्यावेळी ती मुलगी काठीने त्या वाघाला कुत्रा समजून मारते. आता कृपा करून ही शिवसेना कोण, वाघ कोण आणि मुलगी कोण हे विचारू नका, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.