मुंबई:वाघांची(Tiger) संख्या वाढवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विविध अभियान राबवले जात आहे. पण, महाराष्ट्रातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत 23 वाघांचामृत्यू (Tigers Death) झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वाघांपैकी 15 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, 1 रेल्वे अपघातामुळे, 4 विषाच्या वापरामुळे, 1 विजेचा धक्का लागून आणि 2 वाघांचा शिकारीमुळे मृत्यू झाला आहे. या 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ होते तर आठ त्यांचे शावक होते. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान वाघांच्या हल्ल्यात 39 लोकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
वाघांमुळे माणसांच्या मृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत मानव-प्राणी संघर्षामुळे राज्यात 65 जणांचा मृत्यू झाला आहे. या 65 मृत्यूंपैकी 39 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले आहेत. तर, मागील वर्षी 1 जानेवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत 61 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये 31 लोकांचा वाघांमुळे मृत्यू झाला होता.
सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असूनही 2010 मध्ये भारतातील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम आहे, तर देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प पेंच, महाराष्ट्र येथे आहे. 29 जुलै रोजी संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' साजरा करते.