ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 4- काही दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यात एक वाघ व एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना बुधवारी पुन्हा मूल तालुक्यातील डोणी वनपरिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळून आला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनांमुळे वाघ वाचविण्याच्या मोहिमेला जबर हादरा बसत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर झोनच्या मध्यभागी असलेल्या मूल तालुक्यातील डोणी नं. २ मधील कक्ष क्र. ३४८ व ३३० च्या जंगलात वनरक्षक डोंगरवार हे गस्तीवर होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांना वाघ मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना तत्काळ माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. मृत वाघाचे शरीर सडलेले असल्याने वाघ नर आहे की मादी हे सुद्धा कळू शकले नाही. सदर वाघाचा मृत्यू ६ ते ७ दिवसाआधी झालेला असावा असा अंदाज असून डॉ. संदिप छौकर, डॉ. खोब्रागडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. घटनास्थळाला वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पी. एस. गरड, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक नरवने, मूलचे वनपरिक्षेत्राधिकारी पेंदोर, कोळसाचे वनपरिक्षेत्राधिकारी चव्हाण, इको-प्रोचे बंडू धोतरे, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी)