आंबेगावमध्ये रंगणार 'टाईट फाईट'; वळसे पाटील-आढळराव आमने-सामने ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:42 AM2019-08-12T11:42:31+5:302019-08-12T11:42:48+5:30
लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या सर्व पक्षातील उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्ली नाही किमान मुंबई तरी गाठू अशी इच्छा मनी बाळगून या उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. औरंगाबाद माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्या पाठोपाठ शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार शिवाजाराव आढळराव पाटीलही तयारीला लागल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे.
शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा विजयरथ रोखला. राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी केली. त्याला अपेक्षेप्रमाणे यशही आलं आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून शिरूर मतदार संघ जिंकण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा सिद्ध झाला. आता तोच मनसुबा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीला समोर ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिल्ली दूर झाली तरी मुंबई जवळ करायची तयारी आढळराव पाटलांची सुरू असल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे. त्यातच आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र. मात्र विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळवून देण्यात आढळराव यांना कधीही यश आले नाही. याउलट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांनी मागील २९ वर्षांपासून या मतदार संघावर एकछत्री अंमल राखले आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मतदार संघातून शिवसेनेला आघाडी मिळत आली आहे. त्याचे कारण म्हणजे, आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र होते. तसेच वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात सोटंलोट असल्याचं बोलल जात होतं. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साटलोट्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
याआधी आढळराव यांच्या पत्नी कल्पना यांनी येथून निवडणूक लढविली आहे. तर पुत्र अक्षय यांच्या नावाचीही चर्चा जोरात आहे. परंतु, आढळराव लोकसभेत नसल्याने ते विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. तस झाल्यास, आंबेगामध्ये आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात 'टाईट फाईट' होणार हे निश्चित.