दोन गाई फस्त : परिसरातील नागरिकांमध्ये दहशतउमरेड : सुमारे आठवड्याभरापासून तालुक्यातील चिकना शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ माजविला आहे. चिकना-धामना परिसर हा उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगतचा भाग असून वाघाने आतापावेतो दोन गार्इंना फस्त केले आहे. असे असूनही वनविभागाची यंत्रणा सुस्त का, असा सवाल येथील गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. धामना शिवारातील गणपत रामा नेव्हारे याच्या शेतातील गायीवर वाघाने हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवान महादेव लुटे यांच्या गायीला वाघाने ठार मारले. वनविभागाला सूचना दिल्यानंतरही पंचनाम्यासाठी अद्याप कुणीच फिरकले नसल्याने गावकरी चांगलेच संतापले आहेत. सदर वाघ चिकना, धामना परिसरात दररोज दिसत असून झोपी गेलेल्या वनविभागाने आतातरी जागे व्हावे, अशी मागणी भगवान कळंबे, भगवान जुमडे, ज्ञानवंत मांढरे, शंकर बावने, नागोराव मांढरे आदींनी केली आहे. गावातील काही महिलांनाही सदर वाघ दिसल्याने त्यासुद्धा भयभीत झाल्याचे चित्र आहे. मागील काही महिन्यांपासून शिकाऱ्यांचा होत असलेला उच्छाद बघता, अद्यापही वनविभाग कसा बरे सावरला नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
चिकना शिवारात वाघाचा धुमाकूळ
By admin | Published: October 23, 2014 12:30 AM