- प्राची सोनवणे, नवी मुंबई
प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील राजपथावरील चित्ररथात उरणचे ३० कलाकार सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले असून सर्व राज्यांमध्ये या कलाकारांचे कौतुक झाले. यंदाही चित्ररथात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उरणच्या कलाकारांना मिळाली असून हे कलाकार काही दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. या माधमातून टिळकांचा जीवनप्रवास दाखविणारे चित्ररथ पथसंचलन केले जाणार आहे.राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करण्यास सव्वाशे वर्ष उलटली, उत्सवातून एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न चित्ररथाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ‘केसरी’ या पहिल्या वृत्तपत्राचे छपाई यंत्र दाखविले जाणार आहे. या रथामध्ये शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याचे चित्र पहायला मिळणार आहे. लेझीम, पुणेरी ढोल-ताशांचाही यामध्ये समावेश आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही घोषणाबाजीही या माध्यमातून केली जाणार आहे. टिळकांनी शारीरीक व्यायामालाही अतिशय महत्त्व दिले होते याचे वास्तव मल्लखांब आणि कुस्तीच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. मंडाले तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य लिहला याचीही मांडणी या चित्ररथात करण्यात आली आहे. उरणमधील रुद्राक्ष डान्स अकादमीच्या ३० विद्यार्थ्यांचा या चित्ररथात सहभाग असल्याची माहिती कोरीओग्राफर अमित घरत यांनी दिली. गेल्या वर्षी माऊलीची भूमिका साकारणारी चिरनेरमधील जिया गोंधळी हिचाही यामध्ये समावेश असणार आहे. १० ते ४० वर्षे वयोगटातील कलाकारांचा यामध्ये समावेश असून दिल्लीत सराव सुरु आहे. लोकमान्य टिळक यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश त्याची विचारशैली, दुरदृष्टी, कणखरपणा, व्यक्तीमत्त्वाच्या पैलूंचे दर्शन या माध्यमातून घडणार आहे. १० जानेवारीपासून सारे कलावंतांचा दिल्लीत जोरदार सराव सुरु असून उरण तालुक्यातील नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची ही सुवर्णसंधी असून या माध्यमातून संस्कृतीच्या विविध पैलूचे दर्शन घडणार असल्याची माहिती कलाकारांनी दिली. रुद्राक्ष डान्स अकादमीचे नितीन पाटील, नृत्यदिग्दर्शक अमित घरत आणि कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, संजय पाटील, प्रमोद पाटील आदींनी याकरिता विशेष मेहनत घेतली आहे.गेल्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाला आणि यावर्षी देखील चित्ररथात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा खुप आनंद वाटतो. राज्याच्या संस्कृतीचे दर्शन परराज्यांना घडविण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार असून यामध्ये स्पर्धा ही संकल्पना बाजूला ठेवून राज्याचे प्रतिनिधीत्व केले जाणार आहे. - अमित घरत, नृत्यदिग्दर्शक