तेल्हारा, दि.२ : तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाजार समितीच्या यार्डमध्ये सुरू असलेली नाफेडची खरेदी २ मार्च रोजी बंद करण्यात आली. नाफेडची खरेदी सुरू होऊन एक महिन्याचा अवधी होऊनही बाजार समितीच्या यार्डमध्ये १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. खरेदी संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना नाहकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी तेल्हारा तालुक्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नाफेडच्या केंद्रावर आणली असून, बैलगाड्यांसह वाहनांची बाजार समितीच्या यार्डात रांग लागली आहे. तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने पीक जोरात आले. तालुक्यात एकरी जवळपास ७ ते ९ क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना तुरीचे पीक झाले आहे; पण बाजारात पूरक दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले. नाफेडने खरेदी केंद्रे सुरू करावी, यासाठीची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आणि एकदाचे खरेदी केंद्र सुरू झाले. यावर्षी हमी दरासह बोनसही असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकणे पसंत केले. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने १७ जानेवारीपासून खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही सूचना न देता खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. आता नाफेडने खरेदी केलेली तूर अकोला येथील धान्य गोदामांमध्ये पाठवण्यात येत आहेत. अकोला येथील गोदांममध्ये खाली करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तेल्हारा येथून गेलेली वाहने खालीच झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा २ मार्चपासून खरेदी बंद करण्यात आली आहे. सध्या १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना बसतोय भुर्दंड नाफेडकडून चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी आपली तूर तेल्हारा बाजार समितीच्या यार्डात विक्रीसाठी आणली आहे; मात्र नाफेडची खरेदी संथ गतीने होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आणलेल्या वाहनांचे भाडे द्यावे लागत आहे. १७ जानेवारीपासून खरेदी बंद होती. तूर आणलेल्या वाहनांचे भाडे मात्र सुरूच आहे. अजूनही मार्केट यार्डामध्ये असलेली गर्दी पाहता शेतकऱ्यांचा आठ ते दहा दिवस नंबर लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे चांगल्या भावासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तेल्हाऱ्यात तूर खरेदी बंद!
By admin | Published: March 03, 2017 1:24 AM