आधीच्या पतंग आणि बंगल्याचे इतरांना वाटप
अकोला : गेल्या काही वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारिप-बमसंने कधी पतंग तर कधी बंगला या चिन्हावर लढल्या. आता त्या चिन्हांची मालकी इतर पक्षाकडे गेली आहे. त्यामुळे आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या पक्षाला नव्या चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने १८ जानेवारी २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेत राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्षांच्या चिन्हांची निश्चिती करून दिली आहे. त्यामध्ये भारिप-बमसंच्या हातातून आधी लोकप्रिय झालेली पतंग आणि बंगला ही दोन्ही चिन्हे निसटली आहेत. सर्वसामान्य मतदारांमध्ये या चिन्हांची चांगलीच ओळख झाल्यानंतर पक्षाला आता नवे चिन्ह निवडावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीत भारिप-बमसं किती जागा लढणार, त्या सर्व उमेदवारांना सर्वच प्रभागात समान चिन्हाच्या संधीची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षाला आता मुक्त चिन्हांच्या यादीतील ४८ चिन्हांपैकी निवड करावी लागणार आहे.