पिंपरी : भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासून बेटी बचावची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आॅगस्टपासून सुरु झालेली जनसंघर्ष यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी सायंकाळी आली. शहर काँग्रेस समिती सहभागी झाली होती. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब शिवरकर, सरचिटणीस रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, पृथ्वीराज साठे, आमदार शरद रणपिसे, संग्राम थोपटे, रूपाली पाटील, महिला आघाडी माजी प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते कैलास कदम आदी उपस्थित होते.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या विधानाचा निषेध प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. भाजपापासूनच बेटी बचावची वेळ आली आहे. भाजपाच्या प्रतिनिधीने महिलाविषयी केलेले विधान अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. त्यावर कारवाई झालीच पाहिजे. विविध निवडणूकीसाठी इव्हिएम मशीनचा वापर करू नये, अशी मागणी होत आहे. त्यामुळे इव्हिएम मशीनवर आता कोणाचाही भरवसा राहिलेला नाही. पंतप्रधान मोदी कहते है चाय, चाय, योगी कहते है गाय गाय आता जनता करेगी बाय बाय. मोदींना बाय बाय करण्याच्या सर्वांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.’’