पुणे : केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सुमारे २३ सामाजिक संस्थांच्या वसतिगृहातील मुले, वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना दोन वेळचे अन्न देण्यासाठी खासगी व्यक्तींकडे हात पसरून ‘कोणी धान्य देता का धान्य’ म्हण्याची वेळ आली आहे.शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृह, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘अस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये संस्था, वसतिगृहात असलेल्या मुले, व्यक्तींना एका व्यक्तीमागे पाच किलो गहू व तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते.यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेअंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने पुणे शहरातील सुमारे २३ संस्थांना या योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या संस्था पुरवठा विभागाकडे दररोज हेलपाटे मारत आहेत. परंतु शासनाकडून धान्यच आले नसल्याने आम्ही तुम्हाला धान्य उपलब्ध करून देऊ शकत नाही, असे उत्तर ऐकावे लागत आहे. या संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून धान्य न मिळाल्याने संस्थेमधील मुले, व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे.तीन रुपये किलोचा तांदूळ २५ रुपये किलोने घेण्याची वेळहमाल पंचायतीच्या वतीने ‘कष्टकऱ्याची भाकरी’ नावाने गोरगरिबांसाठी स्वस्तात जेवण उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडून आॅगस्टमध्ये ३५ क्विंटल गहू व ९० क्व्ािंटल तांदूळ उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर धान्यच आले नाही, तर कोठून देणार, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येते. परंतु यामुळे तीन रुपये किलोचे तांदूळ २५ रुपये दराने खरेदीची वेळ आली असल्याचे, दिलीप मानकर यांनी सांगितले.धान्य न मिळाल्याने अनेक अडचणी पुणे शहरातील विद्यार्थी सहायक समितीलादेखील शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. वसतिगृहात सुमारे ७००पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. खुल्या बाजारातून धान्य घेणे समितीला परवडणारे नाही. यामुळे शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरवठा विभागाला अर्ज दिला आहे. - प्रभाकर पाटील, संचालक विद्यार्थी सहायक समिती
बालाश्रम, वृद्धाश्रमांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: January 22, 2016 1:56 AM