कर्जत : पूर्वी घरामध्ये पितळी भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. त्या वेळी भांड्याला कलई लावा ताई कलई, असे शब्द कानी पडत होते. मात्र घरातील पितळी भांड्यांची जागा आता स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. त्यामुळे कलई शब्द कानावर ऐकू येत नाही. हा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे राहणाऱ्या बबीताई पवार वयाच्या ६१ व्या वर्षी कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली या ठिकाणी फिरून भांड्यांना कलई लावण्याचे काम करतात. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या हा व्यवसाय करतात. ५० वर्षे घरोघरी फिरून पितळी भांड्यांना कलई लावण्याचे काम त्यांनी केले. मात्र आता या व्यवसायावर गदा आली आहे. पितळी भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. त्यामुळे आठवड्यातील एक, दोन दिवस कधीतरी छोटे-मोठे काम मिळते. संपूर्ण दिवस पायी फिरून कधी कधी कामही मिळत नाही, असे बबीताई पवार यांनी सांगितले.कलईसाठी लागणारे कलई, नवसागर, कोळसा, कॉस्टिक सोडा हे सामानही खूप महाग झाले आहे. त्यामुळे कलई लावण्याच्या पैशातही वाढ करण्यात आली आहे. भांड्याच्या आकाराप्रमाणे आम्ही पैसे आकारतो, असे बबीताई यांनी सांगितले. दोन मुले, सुना, कन्या, नातवंडे अशा संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जोपर्यंत माझे पाय चालतात तोपर्यंत मी हा व्यवसाय करणार, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)पूर्वी घरामध्ये पितळी, तांब्यांच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता बदलत्या काळानुसार आॅल्यिुमीनिअम, स्टील आणि नॉनस्टिकच्या भांड्यांचा वापर स्वयंपाक घरात होऊ लागला आहे.पितळेच्या भांड्यांना सतत्याने कलई लावावी लागते. त्यामुळे पूर्वी गाव, शहरांमध्ये देखिल हे कलई कारागिर फिरत असत. मात्र आत्ता स्वयंपाक घरातील भांडी बदलल्यामुळे या कलई कारागिरांना काम कमी प्रमाणात मिळत आहे.
कलई कारागिरांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: April 06, 2017 2:40 AM