उस्मानाबाद : नवरात्रोत्सव काळात भाविकांसह इतरांना महाद्वारमार्गे प्रवेश न मिळाल्यास गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या बैठका सुरू असून यातून समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांचा ओघ असतो. नवरात्रोत्सवात ही संख्या अनेक पटींनी वाढते. २०१३च्या नवरात्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील वर्षी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भाविकांना महाद्वारऐवजी घाटशीळमार्गे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.याची अंमलबजावणी यंदाही करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र याला तुळजापुरातील व्यापारी, पुजाऱ्यांसह नागरिकांचा विरोध आहे. घाटशीळमार्गे प्रवेश दिल्याने भाविकांच्या अडचणी वाढतात. तसेच यात्रेवरही परिणाम झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवापासून पुन्हा महाद्वारमार्गेच प्रवेश देण्याची मागणी तुळजापूरकरांनी लावून धरली आहे. आज मुंबईत बैठकआंदोलकांच्या विनंतीवरून सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजापूर मंदिर परिसराची पाहणी केली. या प्रश्नी आताच काही बोलणार नाही; मात्र या विषयासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनासह पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बैठकीसाठी पाचारण केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
तुळजापूरात महाद्वार प्रवेशाची कोंडी फुटेना!
By admin | Published: September 13, 2016 5:39 AM