मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. नुकतेच ठाकरे गटातील हा वाद रस्त्यावरही पाहायला मिळाला. मात्र या ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी आजही अनेकांची मनापासून इच्छा आहे. त्यात ठाकरे बंधूचे नात्याने मामा लागणारे चंदूमामा सातत्याने पुढाकार घेत आहे. मार्मिकच्या ६४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबत आर्वजून काका श्रीकांत ठाकरे यांचाही उल्लेख केला. यानिमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला.
या सोहळ्यात उपस्थित असलेले चंदू मामा यांनी ठाकरे बंधू यांच्यावर भाष्य केले. चंदू मामा म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी भाष्य करणार नाही. मी दोघांचाही मामा आहे त्यामुळे नो कमेंटस, मात्र जी मराठी माणसांची इच्छा आहे या दोन्ही भावांनी एकत्र यावं, त्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि केलेले आहेत. अजूनही इच्छा आहे. देवाची कृपा असेल तर ते एकत्र येतील. पुढचा काळच ठरवेल. मी आशावादी आहे. सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. माणसानं आशावादी असावं. देवाची इच्छा असेल तर यश मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंकडून काकांचा उल्लेख
मार्मिकच्या ६४ वर्षाच्या वाटचालीबद्दल सांगायचं झालं तर मार्मिकचा प्रवास असा एक कार्यक्रम ठेवावा लागेल. ज्यात सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरुन सांगता येतील. मार्मिक, सामना आणि शिवसेना हा एक चमत्कार आहे. ही सगळी किमया एका व्यंगचित्रकाराने कुंचल्याच्या आधारावर तयार केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली होती. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. मराठी माणसांचे मुंबई मिळवली होती. संघर्ष खूप झाला होता. त्यामुळे मराठी माणसांच्या आयुष्यात थोडे करमणुकीचे क्षण का नसावेत त्यासाठी मार्मिककार बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले असं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला.
ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही अनेक मराठी माणसांची इच्छा आहे. परंतु या दोघांमधील राजकीय वैर कायम उफाळून आलेले आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र बदललं. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं. त्यांच्या हातातून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निसटलं. त्यावेळीही नाशिक, मुंबई, ठाणे या भागात राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावेत असे बॅनर्स झळकले होते. मात्र यावर दोन्ही भावांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यात अलीकडच्या काही दिवसांत ठाकरे बंधू यांच्यातील संघर्ष वाढलेला दिसला. बीड येथे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांचा ताफा अडवत त्यावर सुपाऱ्या फेकल्या त्याचा बदला म्हणून राज ठाकरेंच्यामनसेनं उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, बांगड्या आणि नारळ फेकून आंदोलन केले. त्यामुळे निवडणुकीत ठाकरे बंधू यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तुर्तासतरी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे प्रयत्न काहींकडून सुरू असले तरी त्यात यश मिळणार नाही मात्र राजकारणात काहीही होऊ शकते ही शक्यता नाकारताही येत नाही.