ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटू नये. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे या गोष्टी पाचव्या वर्षातच शोभून दिसतील अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'सामना' च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
कालही कन्हैया कुमारच्या निमित्ताने 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजप नेत्यांकडून जे दैवत्व दिले जात आहे त्यावर अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. कोणत्याही चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारच्या यशाचे चित्र पडद्यावर साकारणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती, व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.
देशातील यशाचे चित्र सिनेमागृहांत दाखविले जाणार असेल तर मग त्यात पठाणकोट हल्ल्याचाही समावेश आहे काय? नक्षलवादी व कश्मीर खोर्यांतील अतिरेकी आमच्या जवानांचे बळी घेत आहेत. पंतप्रधान मोदींसमोर देशाचे सरन्यायाधीश रडले. हे यश मानावे की अपयश? हिंदुस्थानच्या ३३ टक्के भागांत प्रचंड दुष्काळाचे चित्र आहे. मराठवाडा, बुंदेलखंडसारख्या भागांचे रखरखीत स्मशान झाले व सरकारच्या योजना दोन वर्षांत तेथे पोहोचू शकल्या नाहीत असे सवाल या अग्रलेखातून उद्धव यांनी विचारले आहेत.
'सामना'च्या अग्रलेखातील काही मुद्दे
- पंतप्रधान मोदी यांचे काम व नेतृत्व सक्षम आहे. देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्याची धमक त्यांच्यात नक्कीच आहे, पण मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटू नये या शंकेनेच आम्ही मत मांडले. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे या गोष्टी पाचव्या वर्षातच शोभून दिसतील. आता विरोधकांना टीकेला जागा मिळेल. म्हणूनच हे सर्व कशासाठी, असा प्रश्न आमच्या मनात उभा राहतो.
- पंतप्रधान मोदी हे देवाचे अवतार असल्याची विधाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अधूनमधून केली जात आहेत. हा शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. तामीळनाडूतील जयललिता यांनाही त्यांच्या समर्थकांनी दैवी मखरात बसवले आहे. सत्तेत सर्वोच्चपदी असलेल्या व्यक्तींबाबत असा उदो उदो होतच असतो. आता देवत्व दिले की त्यांचे उत्सव, मंदिर वगैरे विषय ओघानेच आले. भाजपचे एक जुनेजाणते व संयमी नेते व्यंकय्या नायडू यांनी केंद्रातील भाजप सरकारतर्फे अशी माहिती दिली आहे की, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि यशाचा प्रचार व्हायला हवा. राज्यांत, जिल्ह्यांत, गाव पातळीवर हे यश दिसायला हवे म्हणून काही योजना सरकारला सुचविण्यात आल्या आहेत. शिवाय या योजनांना पंतप्रधानांचे किंवा अन्य राष्ट्रीय नेत्यांचे नाव देण्यात येईल. कोणत्याही चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारच्या यशाचे चित्र पडद्यावर साकारणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमान नायडू यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या यशावर आठवड्याला एक चित्रपट माहिती व प्रसारण खाते बनवेल व चित्रपटगृहात मुख्य चित्रपट सुरू होण्यापूर्वी हा चित्रपट दाखवला जाईल. आता पंतप्रधानांना देवाची जागा दिल्यावर या सर्व गोष्टी ओघानेच आल्या. त्यामुळे अयोध्येत राममंदिर उभारले जाणार नसले तरी नव्या देवाचे मनाचे श्लोक, मंत्रपठण बोलण्याची सक्ती होईल असे वातावरण दिसते.
- उदो उदो सरकारी खर्चाने करूनही इंदिराजींसह काँग्रेसचा दारुण पराभव आणीबाणीनंतर देशात झाला, याचे भान सध्याच्या केंद्रीय राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे. भारतीय जनता पक्षापेक्षा पंतप्रधानांविषयी आम्हाला आस्था असल्यामुळेच आम्ही हे परखडपणे सांगत आहोत. नेत्यांना व देवाला शेवटी त्यांचे भक्तच अडचणीत आणतात. महाभारतापासून आजच्या दिल्लीच्या राजकारणापर्यंत याची प्रचीती येत आहे. देशातील यशाचे चित्र सिनेमागृहांत दाखविले जाणार असेल तर मग त्यात पठाणकोट हल्ल्याचाही समावेश आहे काय? नक्षलवादी व कश्मीर खोर्यांतील अतिरेकी आमच्या जवानांचे बळी घेत आहेत. पंतप्रधान मोदींसमोर देशाचे सरन्यायाधीश रडले. हे यश मानावे की अपयश? हिंदुस्थानच्या ३३ टक्के भागांत प्रचंड दुष्काळाचे चित्र आहे. मराठवाडा, बुंदेलखंडसारख्या भागांचे रखरखीत स्मशान झाले व सरकारच्या योजना दोन वर्षांत तेथे पोहोचू शकल्या नाहीत. हे मागच्या सरकारचेच अपयश असल्याच्या चित्रफिती दाखवून काम भागणार नाही
- मखरात बसवून त्यांचे उत्सव साजरे करणे भक्तांसाठी सोपे असते, पण उत्सवात शेवटी चेंगराचेंगरी व आगी लागून सामान्य जनतेची होरपळ होते. महाराष्ट्रात डाळींचे भाव भयंकर वाढले आहेत व तो एक घोटाळाच आहे, असा आरोप विरोधक करीत आहेत हे यश कसे मानावे? महागाई, भ्रष्टाचार, काळ्या पैशांबाबतीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांचे काय झाले? हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. पंतप्रधान मोदी यांचे काम व नेतृत्व सक्षम आहे. देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्याची धमक त्यांच्यात नक्कीच आहे, पण मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटू नये या शंकेनेच आम्ही मत मांडले. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे या गोष्टी पाचव्या वर्षातच शोभून दिसतील.
- तुमची राष्ट्रीय नेत्यांची व्याख्या काय? लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज व स्वत: व्यंकय्या नायडू राष्ट्रीय नेतृत्वाच्या फळीत आहेत. प्रकाशसिंग बादल, नितीशकुमार, केजरीवाल यांनादेखील राष्ट्रीय नेत्यांचे स्थान आहे. देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरू, इंदिरा गांधी, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही भव्य योगदान आहेच. आपल्या देशात तर कन्हैयासारखी पोरेही एका रात्रीत राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्तरावर जाऊन पोहोचतात. त्याचे काय करायचे? तेव्हा राष्ट्रीय योजनांना कोणकोणत्या राष्ट्रीय नेत्यांची नावे देताय ते सांगा, म्हणजे आम्ही टाळ्या वाजवायला मोकळे!