लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
मुख्यमंत्री म्हणाले, अराजकता पसरविण्याचे काही लोकांचे कारस्थान आहे. जे काही चालले आहे त्याबाबतची माहिती सरकारला नाही असे समजू नका, गृह खात्याला सगळे कळते. जनता समजदार आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम जे कोणी करत असेल त्यांच्यापासून समाजाने सावध राहिले पाहिजे. जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजाची बाजू मांडत असताना मी स्वतः जालन्याला जाऊन त्यांना भेटलो, नवी मुंबईत गेलो. १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. सारथी तसेच समाजासाठीच्या महामंडळाला मोठे बळ दिले. मात्र, आज जरांगे यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी आहे, याचा वास येत आहे, असा संशय शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र अशी भाषा सहन करत नाही. हे लक्षात ठेवा. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाने मर्यादित राहिले पाहिजे, फडणवीस यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. ते मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात व ते मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकले. नंतरच्या सरकारने ते घालविले, असे शिंदे म्हणाले.
'माझ्यावरील आरोपांवर समाजाचा विश्वास नाही'
- मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यावर मराठा समाजाचा विश्वास नाही, मी या समाजासाठी मुख्यमंत्री असताना आणि नंतरही काय काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
- पत्र परिषदेत ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असेपर्यंत उच्च न्यायालयातच नाही तर सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकले. माझ्यावर नैराश्यातून आरोप केले जात आहेत. हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे समाजालाही कळते. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत समाजासाठी अनेक योजना माझ्या काळात सुरू झाल्या.
- जी स्क्रिप्ट आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे बोलत होते तीच जरांगे पाटील यांनी का बोलावी, हा प्रश्न मला पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेच आहे की आमच्याकडे माहिती आहे. योग्यवेळी काय ते बाहेर नक्कीच येईल.
- कायदा कोणी हातात घेणार असेल तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल. फडणवीस मला सलाइनमधून विष देणार होते या जरांगे पाटील यांच्या आरोपाबाबत फडणवीस यांनी, 'तुमचा तरी यावर विश्वास आहे का', असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.