महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर चौथीपर्यंतचे वर्ग आता ७ नव्हे तर ९ नंतर भरणार आहेत.
दरम्यान, प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ९ नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवले होते. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची पूर्ण झोप होत नाही त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
पहिली ते चौथीच्या शाळांच्या वेळा बदलल्या
राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटले की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात ५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.
तसेच आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेले ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत आदी. अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशीरा झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.