सुभाष परुळेकर, जि़ सिंधुदुर्गपदरी अठराविश्व दारिद्र्य, कुणाकडे तरी मोलमजुरी करायची आणि दोन वेळची पोटाची खळगी भरायची. पण, आपणालाच मिळत नाही, तेथे मुलाला कोठून घालायचे, अशा विवंचनेत असलेल्या दाम्पत्याने आपल्या चार महिन्यांच्या पोटच्या गोळ्यालाच चक्क गोव्यात विकले. पहिल्यांदा मूल चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या या दाम्पत्याला ग्रामस्थांनी हिसका दाखवताच, मुलाला पाच हजार रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. मूळचे बांदा-देऊळवाडी येथील खेमराज व गीता सावंत हे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच जांभळीचे भरड येथे राहण्यासाठी आले. तेथीलच एका ग्रामस्थाच्या पडवीत त्यांनी संसार थाटला. सकाळी कुणाच्या तरी कामावर जायचे आणि संध्याकाळी यायचे. कोणी पैसे दिले तर जेवण, अन्यथा रात्र तशीच काढायची, असा दिनक्रम त्यांचा होता. या दाम्पत्याने २२ डिसेंबर २०१४ रोजी अपत्याला जन्म दिला होता. चार महिने हे अपत्य त्यांच्यासोबत आहे. कुठेही कामाला जाताना त्याला पोटाशी गुंडाळून आई काम करीत असे. हळूहळू या दाम्पत्याला त्याला खायला घालायचे ओझे होऊ लागले. अनेक वेळा या मुलाला विकण्याचा घाट या दाम्पत्याने घातला होता; पण त्यांना यश येत नव्हते. मुलाला अवघ्या पाच हजार रुपयांना बांदा पत्रादेवी भागातील मेस्त्री नामक व्यक्तीला विकले. याची पूर्ण रक्कमही मिळाली नसल्याचे खेमराजने सांगितले़ (प्रतिनिधी)
दारिद्र्याला कंटाळून मुलाला पाच हजारांना विकले
By admin | Published: April 25, 2015 4:12 AM