उमेश जाधव
ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. १९ - बाप्पा घरी येणार हा आनंद काही वेगळाच असतो , बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या घरून बाप्पा जाणार म्हणून सर्व घरदार आनंदले आहे , तयारीला लागले आहे. याचे कारण ही तसेच आहे. कारण यांच्याकडील बाप्पा थेट सातासमुद्र पल्याड अमेरिका, इंग्लंड व दुबईला निघाले आहेत.
गणेशोत्सव आता अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेवल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात लगबग वाढल्याचे चित्र सध्या गणपतीच्या कारखान्यात पहावयास मिळते.
टिटवाळ्यातील सामान्य कुटुंबातील भाई गोडांबे हे 1974 पासून येथील गणपती मंदीरा मागे "आर्शीवाद कलाकेंद्र " नावाचा गणेश मूर्ती बनविण्याचा कारखाना चालवितात. या कलाकेंद्राची प्रसिद्धी ठाणे - मुंबईसह हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली. त्यामुळेच येथील बाप्पांना दुबई, अमेरिका, इंग्लंडसह भारतातील हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे - मुंबई लगतच्या उपनगरात मागणी वाढली आहे.
गेली 50 ते 55 वर्षांपासून हा व्यवसाय मी आपल्या परिवारासह करित असल्याचे गोडांबे यांनी सांगितले. श्रीकृष्ण, विष्णू, स्वामी समर्थ, छत्रपती शिवराय, शंकर भगवान, टिटवाळ्यातील सिध्दिविनायक आधी गणेश मुर्तीसह मराठमोळ्या थाटातील फेटा घातलेली व दागिन्यांनी मढविलेल्या मूर्त्या या ठिकाणी पहायला मिळतात. केवळ फोटो पाहून हुबेहुब श्रींच्या (गणेशाच्या ) मूर्ती तयार करणे हीदेखील एक कारागीरांच्या कलेतील खासियत असल्याने भारतासह परदेशातूनदेखील येथील मूर्तीना सतत मागणी आहे.
पाच ते सहा इंचापासून ते एक दीड फूट उंचीच्या मूर्ती परदेशी पाठविल्या जातात. अमेरिका व इतर ठिकाणी भारतीय लोक वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी त्यांचे अखिल भारतीय महाराष्ट्रीय मंडळ आहे. त्याच नावाने मूर्ती बुकिंग करुन अमेरिका, दुबई व इतर ठिकाणी पोहचविल्या जातात. हजार अकराशे रुपयांनी खरेदी केलेली मूर्ती परदेशी पोहचेपर्यंत तिची किंमत चार ते पाच हजार रूपयांपर्यत जाते. यंदा साडेतीनशे ते चारशेच्या आसपास मूर्ती परदेशी गेल्याचे महेंद्र गोडांबे यांनी सांगितले.